जयपूर : सवाई मानसिंह क्रिकेट मैदानावर रंगलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने राजस्तानच्या संघावर 10 धावांनी विजय मिळविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने या मैदानात आयपीएलमधील सर्वोच्च 219 धावसंख्या उभारत राजस्तानसमोर 220 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्तानच्या सलामी जोडीने धमाकेदार सुरुवात केली.
पंजाब किंग्जच्या संघाने ठेवलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्तानकडून यशस्वी जैस्वाल 50 (25) आणि वैभव सूर्यवंशी 40 (15) यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. त्यानंतर ध्रुव जुरेलच्या अर्धशतकी खेळीने पंजाबचे टेन्शन वाढवले होते. पण तो अर्धशतक करून माघारी फिरला अन् पंजाबसाठी या सामन्यातील विजयासह प्लेऑफ्सचा मार्ग सोपा झाला. 12 सामन्यानंतर पंजाबच्या खात्यात आता 17 गुण जमा झाले आहेत.
गुजरातच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना जिंकला तर गुजरात टायटन्सचा संघ 18 गुणांसह प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणारा पहिला संघ ठरेल. एवढेच नाही त्यांच्या विजयासह पंजाब किंग्जसह आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघही प्रत्येकी 17-17 गुणांसह प्लेऑफ्ससाठी पात्र ठरेल. ही परिस्थिती दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौचे टेन्शन वाढवणारी ठरेल. लखनौला तर 17 गुणांपर्यंत पोहचण्याची संधी नसल्यामुळे ते प्लेऑफ्सच्या शर्यतीतूनच बाहेर पडतील. पंजाबच्या संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना नेहल वढेराने 37 चेंडूत 70 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात शशांक सिंह याने 30 चेंडूत 59 धावा करत संघाच्या धावफलकावर 219 धावा लावल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ निर्धारित 20 षटकात 209 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पंजाबकडून गोलंदाजीत हरप्रीत ब्रारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय ओमरझाई आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी 2-2 बळी आपल्या खात्यात जमा केल्या.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्ज : नेहल वाढेरा 70, प्रियांश आर्या 9, प्रभासिमरन 21, नेहल वाढेरा 70, श्रेयस अय्यर 30, शशांक सिंग नाबाद 59, अझमतुल्ला नाबाद 21, अवांतर 9 एकूण 20 षटकांत 219/5
राजस्तान : जैस्वाल 50, वैभव सुर्यवंशी 40, संजू सॅमसन 20, रियान पराग 13, ध्रुव ज्युरेल 53, हॅटमायर 11, दुबे 7 एकूण 20 षटकांत 209/7
Fans
Followers